१४ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला
समाजातल्या अनिष्ट प्रथा-परंपरा, श्रद्धा- अंधश्रद्धांचा वेध आजवर अनेक चित्रपटांतून घेण्यात आला. बळी दिल्यावर इप्सित साध्य होणं हादेखील त्याचाच एक भाग. मात्र, त्यात असलेली श्रद्धा-अंधश्रद्धा हा मानवी मनाचा खेळ असतो. याच श्रद्धा-अंधश्रद्धेच्या संघर्षाचं चित्रण असलेला शिरपा हा चित्रपट १४ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘शिरपा’ चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले असून, जागर टीव्ही अँड फिट नेटवर्क प्रा. लि.च्या प्रशांत मानकर, सुनील सिरसाट यांनी ‘शिरपा’ची निर्मित केली आहे. संकेत साक्षी फिल्म्सच्या गोपाळ भट, सुदेशना नवकार, किरण चव्हाण – डाबेराव, गजानन कळमकर यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. सुभाष गवई हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
‘शिरपा’ ही गोष्ट आहे शालू आणि शंभू या भाबड्या जोडप्याची. या जोडप्याला मूल होत नसतं. त्यामुळे घर सोडून हे जोडपं गावाबाहेर जातं. मूल होण्यासाठी गावच्या देवीला बोकड बळी द्यायला हवा असं सांगितलं जातं. शंभूला हे पटत नसतं. मात्र, बायकोच्या इच्छेखातर तो तसं करायला तयार होतो. बळी देण्यासाठी ते बोकड आणतात. त्याच्यावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करतात. मात्र, बोकडाचा बळी देण्यावरून शंभू द्विधा मनस्थितीत सापडतो. ठरल्याप्रमाणे ते बोकडाचा बळी देतात का, शालूला मूल होतं का, त्यांच्या श्रद्धेचं काय होतं अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपटाची उत्सुकता वाढवणारी आहेत.
अतिशय संवेदनशील असं हे कथानक मानवी मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न करतं. त्याचवेळी समाजव्यवस्था, रूढींवरही परखड भाष्य या चित्रपटातून करण्यात आलं आहे.
‘शिरपा’ चित्रपटात अभिनेते मिलिंद शिंदे, अभिनेत्री छाया कदम, सुनील सिरसाट, नम्रता जाधव, प्रेम किरण आणि रवींद्र बेर्डे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा बी. गोपनारायण यांची असून पटकथा आणि संवाद नितीन कांबळे यांनी लिहिले आहेत. जिगर खान व रविराज सिंग यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन आनंद ए. राम यांनी केले आहे. लहू ठाकूर, किशोर बळी, प्रदीप बोरसे यांनी लिहिलेल्या उत्तम गीतांना भास्कर डाबेराव, तृप्ती चव्हाण, अतुल राहुल यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, स्वप्नील बांदोडकर गायिका उर्मिला धनगर यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. धनराज तावडे यांचे कलादिग्दर्शन असून नृत्यदिग्दर्शक म्हणून संतोष भांगरे यांनी काम पाहिले आहे.