अरुण शर्मा यांचे रंगलेखन जहांगीरमध्ये
सुप्रसिद्ध रंगलेखक अरुण शर्मा यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ‘आर्ट फॉर अ कॉज’ हे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन दि. २३ ते २९ मे या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.
मुंबईत प्रथमच अंध व्यक्तिंच्या मदतीसाठी सीएसआर योजने अंतर्गत हे प्रदर्शन भरवलं जात असून जहांगीर आर्ट गॅलरीचे अध्यक्ष अदी जहांगीर यांच्याहस्ते दि. २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. नॅब इंडीया आणि प्रोवेस हाऊस यांचं सहकार्य या प्रदर्शनाला लाभलं आहे.
चित्रकार अरुण शर्मा यांनी साकार केलेल्या कॅनव्हासवरच्या या २१ कलाकृती ‘चंद्रावती ऍन्ड बियॉन्ड फ्रॉम माऊंट अबू फॉर चारीटी’ या शिर्षकाखाली सादर होत आहेत. इसवीसन पुर्व ६३ सालमधील चंद्रावतीची संस्कृती पश्चिमी भारताचा मुकुटमणी होती. १९१७ पासून इथल्या बर्याच प्राचीन मुर्ती चोरीला गेल्या तरीही तेथे उरलेल्या काही मुर्ती अरूण शर्मा यानी चित्रबद्ध केल्या आहेत. कलेची उत्तम जाण आणि प्राचिन संस्कृतीची माहिती या चित्रकाराला असल्याने या कलाकृती देखण्या झाल्या आहेत.
मुंबईच्या सर्व कला प्रेमी आणि कला संग्रहकानी या कलाकृती आपल्या संग्रही जतन करून ठेवण्यासारख्या आहेत. अंध व्यक्तिंच्या मदतीसाठी योजण्यात आलेल्या या उपक्रमाला रसिकांनी उदंड प्रतिसाद द्यावा अशी विनंती आयोजकांकडून केली गेली आहे.