पुण्यात ११ हजार गुलाबजामचे वाटप
‘गुलाबजाम’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अतिशय हटके प्रमोशन सध्या सुरू आहे. १६ फेब्रुवारीपासून संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला ‘गुलाबजाम’ चित्रपट पहायला यायचं हं! असे निमंत्रण चक्क गुलाबजाम खायला घालून देण्यात आले, पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता आणि अभिरुची सिटी प्राईड या चित्रपटगृहात सिनेमा पाहायला आलेल्या सुमारे ११ हजार प्रेक्षकांना एका टेस्टी सिनेमाला येण्याचे हे गोड निमंत्रण देण्यात आले.
सचिन कुंडलकर लिखित आणि दिग्दर्शित ‘गुलाबजाम’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे प्रेक्षकांना हे आगळे वेगळे निमंत्रण भावले आणि अनेक प्रेक्षकांनी या स्वादिष्ट सिनेमाचा आस्वाद घेणारच असल्याची ग्वाही दिली. रसरशीत अशा ‘गुलाबजाम’ची पंगत येत्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात बसणार आहे.