बहुचर्चित चित्रपटाचं म्युझिक लाँच
‘हे मन झाले तुझे…’ हे आनंदी जोशीनं गायलेलं गीत… रोहित राऊतच्या ‘कधी नी कसे’ या गाण्याला मिळालेली दाद… सिद्धार्थ चांदेकर आणि पॉला मॅकग्लिन या जोडीचा रोमँटिक डान्स… अशा शानदार वातावरणात आगामी ‘पिंडदान’ या बहुचर्चित चित्रपटाचं म्युझिक लाँच करण्यात आलं.
झी टॉकिजतर्फे आयोजित ‘बिग तिकीट’ या रंगारंग कार्यक्रमात ‘पिंडदान’चं म्युझिक आणि पोस्टर लाँच करण्यात आलं. म्युझिक लाँचच्या वेळी संगीतकार सागर धोटे, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, मनवा नाईक, पॉला मॅकग्लिन यांच्यासह प्रस्तुतकर्त्या पूनम शेंडे, दिग्दर्शक प्रशांत पाटील, कॅमेरामन बंटी देशपांडे, कॉस्च्युम डिझायनर दीपाली देशपांडे, गायिका आनंदी जोशी, प्रियांका बर्वे, सावनी रवींद्र, गायक रोहित राऊत आदी उपस्थित होते.
सारथी एंटरटेन्मेंटच्या पूनम शेंडे यांनी प्रस्तुत केलेल्या ‘पिंडदान’ या चित्रपटाची निर्मिती उदय पिक्चर्स, अश्तिका इरा एलएलपी यांनी केली आहे. फॅशन इंडस्ट्रीतलं मोठं नाव असलेले बंटी प्रशांत या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. प्रशांत पाटील यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन आणि बंटी देशपांडे यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. चित्रपटाचं लेखन अविनाश घोडके यांनी केलं आहे. वैभव जोशी आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे.
गूढ प्रेमकथा असलेल्या ‘पिंडदान’मध्ये पाच गाणी आहेत, चित्रपटाच्या कथानकाला उत्तम गीत-संगीताची जोड मिळाली असल्याची भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त करण्यात आली आहे.