मनोरंजनाचं कम्प्लिट पॅकेज असणारा चित्रपट
दोन मित्रांची आगळीवेगळी कथा असलेला ‘फ्रेंड्स’ हा सिनेमा येऊ घातला आहे. मराठीतील सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि सचीत पाटील मुख्य भूमिकेत असणा-या या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये जोरदार उत्सुकता आहे.
अॅक्शन, रोमान्स, फ्रेंडशिप, इमोशन असा मनोरंजनाचं कम्प्लिट पॅकेज असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्जा झाला असून येत्या १५ जानेवारीला हा सिनेमा रिलिज होतोय.
आर.मधेश यांनी या सिनेमाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे. स्वप्नील जोशी आणि सचीत पाटील यांच्यासोबत या सिनेमात गौरी नलावडे ही अभिनेत्री बघायला मिळणार आहे. हा सिनेमा रिलिज होण्याआधीच यातील गाणी सुरपहिट ठरली असून ‘फ्रेंड्स’मधील ‘प्रेमिका’ हे स्वप्नील जोशीवर चित्रीत गाणं सध्या चांगलंच गाजत आहे. अमित राज, पंकज पडघन आणि निलेश मोहरीर या तीन दिग्गज संगीतकारांनी या सिनेमाला संगीत दिले असून मंदार चोळकर आणि गुरू ठाकूर यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत. संजय केळापुरे, आर.मधेश, प्रेम व्यास आणि मनीष चंदा यांची निर्मिती असलेल्या या सिनेमा कथा आर.मधेश यांची असून संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिले आहेत. तर या सिनेमाचे सहायक निर्माते शिव राजपुत्रा हे आहेत. सिनेमाचे प्रमोशन पार्टनर्स अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार हे आहेत.